Kanyagat Mahaparvkal / कन्यागत महापर्वकाळ

/Kanyagat Mahaparvkal / कन्यागत महापर्वकाळ

Kanyagat Mahaparvkal / कन्यागत महापर्वकाळ

कन्यागत महापर्वकाल

गुरू राशीत बारा वर्षांनी कन्या राशीत प्रवेश करत असून, त्यानुसार ११ ऑगस्टला नृसिंहवाडी येथे कन्यागताला प्रारंभ होत आहे. वर्षभर हा सोहळा सुरू राहणार असून त्यासाठी हजारो भाविक नृसिंहवाडीत येणार आहेत.

जसे गुरु सिंह राशीत गेला की सिंहस्थ, गुरु कुंभ राशीत गेला की कुंभमेळा, अगदी तसेच गुरु कन्या राशीत गेला की कन्यागत महापर्वकाल साजरा केला जातो.

गंगा भागीरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे असते. त्यातून जलप्रवाह नसतो. मात्र, गुरु ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केला की, कुंडातून जलस्तोत्र सुरु होतो. तो पुढे वर्षभर सुरू राहतो. या बारा वषार्ंतून येणार्‍या पर्वास कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात.

———-

कन्यागत महापर्वकाल

सिंहस्थ – कुंभमेळ्याइतकीच पवित्र दैवी पर्वणी

|| हर हर गंगे ॥ हर हर कृष्णे ॥

दर १२ वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाल हा सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे १२ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू होणार असून तो १२ सप्टेंबर २०१७ पर्यंत असा १३ महिने सुरू राहणार आहे. यामध्ये एकूण ६२ पर्वकाळ आहेत. त्यातील ६ मुख्य पर्वकाळ आहेत. गुरू जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा गंगा नदीच्या किनारी हरिद्वार येथे कुंभमेळा साजरा होतो. गुरू जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा गोदावरी नदीच्या किनारी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ महापर्वकाळ साजरा होतो. अगदी तसेच गुरू जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो तेव्हा कृष्णा नदीच्या किनारी नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल साजरा केला जातो. गेल्या हजारो वर्षांपासूनची ही परंपरा आहे. कन्यागत म्हणजे कन्येमध्ये गेलेला. भारतामध्ये प्रतीवर्षी सर्वत्र लहान मोठे असे नद्यांचे मेळे सुरु असतात. त्यातील २५० हून अधिक मेळे प्रसिद्ध आहेत. गुरु हा ग्रह प्रत्येक राशीमध्ये वर्षभर मुक़्काम ठोकून असतो. त्यावेळी देशाच्या विविध भागांमध्ये नद्यांच्या किनारी उत्सव सुरु असतात. या नद्यांच्या उत्सवांनाच महापर्वकाल असे म्हणतात. अशा वेळी जिथे महापर्वकाल असतो त्या ठिकाणच्या नदीमध्ये गंगा नदीचे अवतरण झालेले आहे अशी श्रद्धा असते. संपूर्ण वर्षभर या स्थानिक नदीच्या सान्निध्यामध्ये गंगा नदी राहते. जणूकाही भक्तांची आर्तता पाहून गंगा नदी स्वत:हून त्यांना भेटायला तेथील नदीमध्ये येवून वास करते अशी ही महापर्वकालाची संकल्पना आहे. या महापर्वकालालाच सिंहस्थ, कुंभमेळा, पुष्कर स्नान, कन्यागत महापर्वकाल इ. नावांनी ओळखले जाते.

सह्याद्री पर्वतावर धोम महाबळेश्वर नावाची एक पर्वतरांग आहे. या डोंगरावर श्रीक्षेत्र महाबळेश्वर हे ठिकाण आहे. हे समुद्रसपाटीपासून सुमारे १२२० मीटर एवढ्या उंचीवर वसलेले आहे. येथेच सात नद्यांचे उगम मंदिर आहे. आमलकीच्या आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळांमधून सात नद्यांचा येथे उगम होतो. या ठिकाणापासून पाण्याचे स्त्रोत सुरु होतात. आता तिथे कुंडे बांधली आहेत. या सात कुंडांची नावे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागिरथी आणि सरस्वती अशी आहेत. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री या चार कुंडातून नित्य निरंतर जलप्रवाह सुरु असतो. सरस्वती नदी ही सदैव गुप्त रुपाने वास करुन असते. त्यामुळे तिच्यातील प्रवाह दिसत नाही. गायत्री कुंडातून साठ वर्षातून एकदाच कपिलाषष्ठीच्या योगावर जलप्रवाह येतो. गायत्रीचे दर्शन एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकदाच होऊ शकते.

गंगा भागिरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे असते. त्यातून पाण्याचा एकही थेंब येत नाही. मात्र गुरु ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केला की अचानक गंगा कुंडातून जलस्त्रोत सुरु होतो आणि तो सतत वर्षभर सुरु राहतो. गुरु कन्या राशीतून बाहेर पडला आणि त्याने तूळ राशीमध्ये प्रवेश केला की पुन्हा गंगा कुंड कोरडे पडते. पुन्हा पुढची अकरा वर्षे ते पूर्णत: कोरडे राहते. बारा वर्षांनंतर गुरुने कन्या राशीमध्ये पुन्हा प्रवेश केला की गंगा कुंडातून जलप्रवाह सुरु होतो. यालाच कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात.

पुराणकाळातील एक कथा आहे. तेव्हा काशी क्षेत्री दिवोदास या नावाचा एक राजा राज्य करीत होता. काशीक्षेत्र ही भरतवर्षातील सर्वात पुण्यवान नगरी मानली जाते. सर्व प्रकारचे साधु, संत, तपस्वी, मुनी, योगी, ऋषी, विद्वान, मुमुक्ष, विद्यार्थी यांची एकच मांदियाळी या क्षेत्री जमलेली दिसून येते. त्यावेळीही तशीच मंडळी मोठ्या प्रमाणावर ज्ञान साधना करण्यासाठी आणि तप:श्चर्या करण्यासाठी काशी क्षेत्री निवास करून रहात होती. दिवोदास राजा धर्मशील आणि आचरण संपन्न होता. मात्र त्यावेळी हैहय या कुळातील राजांनी काशीक्षेत्रावर सतत आक्रमणे करायला सुरुवात केली. दिवोदास राजा आणि त्यांच्यामध्ये वारंवार लढाया होऊ लागल्या. अशाच एका युद्धामध्ये हैहय राजाने जोरदार आक्रमण करुन दिवोदास राजाचा पराभव केला. त्यावेळी दिवोदास राजा रणांगणावरुन पळून गेला आणि रानोमाळ भटकू लागला. हैहयांनी काशीक्षेत्राचे राज्य बळकाविले आणि सर्वांचा छ्ळ सुरु केला. काशीनगरीतील धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरण पूर्णपणे बिघडले. यज्ञ बंद पडले. कथा कीर्तने बंद झाली. राजाश्रय संपुष्टात आला. सर्वत्र अनागोंदी माजली. काशी विश्वेश्वर मंदार पर्वतावर वास्तव्याकरिता निघून गेले. अखंड ज्ञानदान करणारी ज्ञानसत्रे उजाड झाली. तेथील विद्वान, ऋषी, मुनी, साधु, संत यांनी मग काशी नगरीचा त्याग केला आणि ती दक्षिण दिशेकडे निघाली. त्यांची ही तीर्थयात्रा नाशिकजवळ गोदावरी किनारी आली. तिथे त्यांना प्रसन्न वाटले. काही ऋषीमुनींनी त्या परिसरामध्ये आश्रम उभे करण्याचे ठरवले. काही ऋषीमुनींनी आपली यात्रा दक्षिणेकडे पुढे चालू ठेवली. त्यामध्ये व्यासमुनी आणि श्रीदत्तात्रेय यांचे बरोबर अनेक ऋषीमुनी, तापसी आणि योगी होते. तीर्थयात्रा करीत ते सह्याद्री पर्वतावर येऊन पोहोचले. तिथे ते धोम महाबळेश्वर डोंगरावर सप्त नद्यांच्या उगमस्थानी येऊन पोहोचले. तेथून नजीकच जोर या गावी कृष्णा नदीचा जलौघ धबधब्याच्या रुपामध्ये पडताना दिसला. तिथले ते नयनरम्य आणि मनोहारी वातावरण पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. प्रत्यक्ष श्रीकृष्णावेणीचे भूतलावर दर्शन झाल्याने ते आनंदाने पुलकित झाले. त्या परम पावन कृष्णावेणीच्या प्रवाहाकडे पहात असताना त्यांना काशी क्षेत्रातील गंगेची तीव्रतेने आठवण झाली. गंगेच्या आठवणीने त्यांचे नेत्र अश्रूंनी डबडबले. साहजिकच त्याक्षणी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की इथे या ठिकाणी प्रत्यक्ष गंगा अवतरली तर किती बरे होईल. इच्छा मनात येताच त्यांना अतिशय आनंद झाला. त्यासाठी त्यांनी विष्णू भगवानांना साकडे घातले आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केली. त्यावेळी तिथे साक्षात श्रीविष्णू प्रकट झाले. तेव्हा ऋषीमुनींनी आणि महायोग्यांनी अनन्यभावे शरण जाऊन आपल्या मनातील इच्छा त्यांना निवेदन केली. ते म्हणाले, “हे भगवंता नारायणा, चराचराच्या इच्छेच्या पूर्तीकरिता आणि संपूर्ण जगाच्या उद्धाराकरिता आपण गंगेला याठिकाणी पाठवा. गंगा आणि कृष्णा यांचा येथे संयोग व्हावा आणि हा सह्याद्री पर्वत आणि ही दक्षिणभूमी पावन व्हावी आणि सर्वांचा उद्धार व्हावा.” ती जगतकल्याणकारक मंगलमय प्रार्थना ऐकून भगवान विष्णूंना संतोष झाला. त्यांनी तात्काळ गंगेचे स्मरण केले. तेथे गंगा प्रकटली. भगवंतानी तिला सर्वांची इच्छा सांगितली. त्यावेळी भगवान विष्णूंच्या पायाच्या अंगठ्यातून गंगा बाहेर पडली आणि कृष्णेच्या जलौघामध्ये विलीन झाली. कृष्णा हे साक्षात विष्णूंचे जलरुप आहे हे गंगेने जाणले. अनेक पातकी लोकांनी स्नान केल्यामुळे आणि संपर्कामध्ये आल्याने त्या सर्वांच्या पापांचे ओझे गंगेच्या डोक्यावर होतेच. त्यामुळे साक्षात विष्णूतनु असलेल्या कृष्णावेणीमध्ये एक वर्षभर निवास करुन आपले साचलेले पापांचे ओझे हलके करावे असे गंगेला वाटते. आपल्यासाठी ही एक उत्तम पर्वणी आहे असे मानून तिला अतिशय आनंद झाला. गंगा आणि कृष्णा यांचे प्रत्यक्ष भगवान विष्णू, श्रीदत्तात्रय आणि व्यासादिक ऋषी मूनींच्या समोर दैवी मिलन झाले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. सह्यगिरी तर आनंदाने बेभान झाला. सर्वांनी हा अद्भुत प्रसंग आपल्या हॄदयामध्ये साठवून घेतला. एक अत्यंत अपूर्व अशी घटना घडली. साक्षात हरितनुजा म्हणजे हरिच्या शरिरापासून निघलेल्या श्रीविष्णूंचेच जलस्वरुप असणाऱ्या परमपवित्र कृष्णावेणी नदीमध्ये परम मंगलदायी पतितपावन आणि भगवान विष्णूंच्याच पायाच्या अंगठ्यामधून बाहेर पडलेली विष्णूपदी गंगानदीने प्रवेश केला. हा अद्भुत दैवी आनंदमय संयोग पाहून चराचराला आनंदाचे भरते आले. त्याचवेळी सर्वांनी भगवान विष्णूंच्या समोर गंगामातेकडून वचन घेतले की ती दर बारा वर्षांनी पुन्हा कृष्णा नदीला भेटण्यासाठी याच प्रकारे या ठिकाणी येईल. गंगेनेही याला आनंदाने अनुमती दिली. त्या वेळेपासून गंगा नदी श्री कृष्णावेणी नदीच्या भेटीला दर बारा वर्षांनी नित्यनियमाने येत असते. अत्यंत पवित्र अशा या आनंदमय मिलनालाच कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात. जणू बहिणी – बहिणी एकत्र याव्यात तसा दर बारा वर्षांनी हा आश्चर्यकारक सोहळा घडतो. याच वेळी श्रीविष्णूंनी संपूर्ण भरतखंडातील सर्व तीर्थांना आपल्या बरोबर घेऊन येण्याची आज्ञा गंगेला केली. तिनेही ती आनंदने मान्य केली. कारण या सर्व तीर्थांनांही त्यांच्यामध्ये साचलेल्या पापापासून शुद्धी मिळवण्याची ही एक उत्तम संधी होती. संपूर्ण भारतामध्ये एकूण साडेतीन कोटी तीर्थे आहेत अशी श्रद्धा आहे. ती सर्व गंगेबरोबर एक वर्ष कन्यागत महापर्वकालामध्ये कृष्णावेणीमध्ये येऊन वास करतात. अशा प्रकारे कन्यागत महापर्वकाल हा अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि सर्व प्रकारच्या कायिक, वाचिक आणि मानसिक पापापासून, दुष्कृत्यांपासून मुक्ती देणारा असा आहे. श्रीगुरुचरित्रामध्ये या संबंधी खालील वर्णन आले आहे.

कन्यागती कृष्णेसी । त्वरित येते भागीरथी ।

तुंगभद्रा तुळागती । सुरनदी प्रवेश ॥

गुरुचरित्र अ. १५, ओवी ६२

देवनदी गंगेमध्ये भाविकलोक त्यांची पापे सतत विर्सजित करत असतात. अकरा वर्षांमध्ये अशी साठवून राहिलेली पातके घेऊन गंगा नदी आपल्या मोठ्या बहिणीला कृष्णावेणीला भेटायला येते. येताना साडेतीन कोटी तीर्थांना ती बरोबर घेऊन येते. वर्षभर इतरत्र कोठेही न जाता ती कृष्णावेणीमध्ये वास करुन रहाते आणि साचलेल्या सर्व पापांपासून मुक्त होते. श्रीकृष्णावेणी प्रत्यक्ष हरितनु असल्याने सर्व प्रकारच्या पापांचे तिच्यामध्ये परिमार्जन होते. जसे अग्नीमध्ये सर्व काही भस्म होते त्याप्रमाणे श्रीकृष्णेमध्ये सर्व पापांचा निचरा होतो. कन्यागत महापर्वकाली श्रीकृष्णावेणीचे माहात्म्य फार मोठे आणि अनुपमेय असेच आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, मुक्तिनगरी काशी, बद्रीकेदार, कैलास मानसरोवर, सप्तपुरी, द्वारका, प्रभास, प्रयागक्षेत्र, कुरुक्षेत्र, गया, डाकोर, जगन्नाथपुरी, दक्षिण काशी कोल्हापुर, व्यंकटाचल तिरुपती, सोरटी सोमनाथ, श्रीशैल्य, गोकुळ वृंदावन, कन्याकुमारी, शबरी मलाई अशी साडेतीन कोटीहून अधिक तीर्थे पापांचे ओझे हलके करण्यासाठी कन्यागत महापर्वकालामध्ये श्रीकृष्णावेणीचा आधार घेतात.

अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की महानदी गंगा कृष्णा नदीस भेटावयाला का येते? कृष्णा गंगेला भेटायला का जात नाही? गंगा नदी संपुर्ण त्रैलोक्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. मग असे का घडते ? खरंतर अशी शंका येणे स्वाभाविक आहे गंगा नदी खरोखरच सर्वश्रेष्ठ आहे. ती विष्णूंच्या चरणकमलातून निघाली आहे. प्रत्यक्ष भगवान शंकराच्या जटेमध्ये तिचा वास आहे. महाकवी वल्मिकींनी सुद्धा “ क्षपित कलि कलंका, जान्हवी न: पुनातु ” म्हणजे कालिकालाचे सकल दोष नाहीसे करुन गंगा आम्हाला पवित्र करते असे म्हटले आहे. पण तरीही गंगेला श्रेष्ठत्व देता येत नाही. कारण ती भगवंताच्या पायातून निर्माण झाली आहे. कृष्णा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचेच जलरुप आहे. कृष्णा ही साक्षात विष्णू स्वरुपिणी आहे. आणि वेण्णा ही साक्षात शंकर स्वरुपिणी आहे कृष्णावेणी म्हणजे हरिहरांचे ऐक्यरुप आहे. म्हणून तिला ज्येष्ठ भगिनींचे स्थान दिले आहे. भारतीय परंपरा आणि रितीरिवाज यानुसार लहान बहिण किंवा लहान भाऊ नेहमी मोठ्या बहिणीकडे किंवा मोठ्या भावाकडे भेटावयाला जातात. ज्येष्ठांचा मानसन्मान राखण्याची ही प्राचीन लोकपरंपरा आहे. त्यानुसार अतिशय प्रेमाने आणि अगत्याने गंगानदी कृष्णानदीला भेटावयाला येते. अशी ही कन्यागत महापर्वकालाची हजारो वर्षे चालत आलेली परंपरा आहे.

कन्यागत महापर्वकाल हा अत्यंत पुण्यप्रद अशी पर्वणी मानली जाते. वनवासामध्ये असताना ११ वर्षे पांडवांनी तीर्थाटन केले आणि १२ व्या वर्षी ते कृष्णातीरी माहुली आणि वाई येथे आले. तेथे कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम होतो. जणू हरिहरांचे तेथे मिलन होते. पांडवांनी त्या परिसरामध्ये वर्षभर निवास केला. तेव्हा कन्यागत महापर्वकाल सुरु होता. संपूर्ण वर्षभर त्यांनी तेथे विविध प्रकारचे धार्मिक विधी होम- हवन आणि यज्ञ संपन्न केले. त्यामुळे नंतर त्यांचे भद्र झाले म्हणजे कल्याण झाले. श्रीगुरुचरित्रातील स्पष्ट उल्लेखाप्रमाणे साक्षात दत्तावतार नॄसिंहसरस्वती स्वामी जेव्हा कर्दळीवनाकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा गुरु कन्या राशीमध्ये होता आणि कन्यागत महापर्वकाल सुरू होता. याचा अर्थ कन्यागत महापर्वकालाची परंपरा खूप प्राचीन असून हजारो वर्षे सुरु आहे असे दिसून येते या पर्वकाळामध्ये कृष्णा नदीच्या उगमापासून ती सागराला मिळेपर्यंत सर्वत्र स्नान, दान, होम, हवन, यज्ञ इ. धार्मिक विधी करणे हे अत्यंत पुण्यदायी आहे. ते सर्व प्रकारच्या पातकांपासून आपली मुक्ति करते. तसेच तर्पण, श्राध्द इ. विधी या काळी केले असता पितर संतुष्ट होतात, ग्रहपीडा नाश पावते आणि सर्व प्रकारची प्रगती होते, शारिरीक आजार, पीडा, क्लेश, नाहीसे होतात अशी श्रद्धा आहे. कन्यागत महापर्वकाल कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र महाबळेश्वर या उगमस्थानापासून वाई, माहूली, कऱ्हाड, नीरा नरसिंहपूर, औदुंबर, ब्रम्हनाळ, हरिपूर-सांगली, श्रीनॄसिंहवाडी, गणेशवाडी, खिद्रापूर, उगार, कुरवपूर पासून ते कृष्णा सागराला मिळेपर्यंत विविध ठिकाणी साजरा केला जातो.

अर्थात असे असले तरी श्रीक्षेत्र श्रीनॄसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल मोठ्या प्रमाणावर साजरा केल जातो. नॄसिंहवाडी ही साक्षात दत्तप्रभूंची अत्यंत प्रिय अशी राजधानी आहे. याविषयी प. प. टेंबे महाराजानी म्हटले आहे की, “ नरसोबाची वाडी जे लोकमान्या । कृष्णातीरा शोभवि जे सुधन्या ॥ अन्या तैशी देखिली म्या साची । श्रीदत्ताची राजधानी सुखाची ॥” हे क्षेत्र पूर्वापार फार प्राचीन काळापासून पुण्यक्षेत्र आहेच. शिवाय श्रीदत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्रीनॄसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी तेथे १२ वर्षे राहुन तप:साधना केल्याने या क्षेत्राला दिव्य अशी झळाळी प्राप्त झालेली आहे. ज्या प्रमाने कुंभमेळा भरतो तेव्हा गंगा किनारी तिच्या उगमापासून सागर संगमापर्य़ंत कुठेही स्नान आणि धार्मिक विधी करणे पुण्यदायी आहे. तरीही हरिद्वार हे विशेष क्षेत्र आहे. त्या ठिकाणाला विशेष महत्व आहे. कुंभमेळयाच्या पर्वकाळी ऋषी, मुनी, साधु, संत, योगी, याचबरोबर प्रत्यक्ष देव देवता, ब्रह्मा, विष्णू, महेश, यक्ष, किन्नर, गंर्धव, अप्सरा आणि चराचरातील सर्व हरिद्वार या क्षेत्री येतात आणि पर्वकाळामध्ये स्नान करतात. त्याचप्रमाणे सिंहस्थ पर्वामध्ये गोदावरी नदीच्या उगमापासून सागर संगमापर्य़ंत स्नान, धार्मिक विधी केले तरी ते पुण्यदायी आहे. परंतू नाशिक त्र्यंबकेश्वर क्षेत्री विशेष महत्व आणि माहात्म्य आहे. हरिद्वार प्रमाणेच तिथेही देवदेवतादींबरोबरच चराचरातील सर्व स्नानासाठी येतात. त्याचप्रमाणे नॄसिंहवाडी हे कन्यागत महापर्वकालातील अत्यंत पुण्यदायी आणि पवित्र असे क्षेत्र आहे. या पर्वकाळात नॄसिंहवाडी स्नान, होम-हवन, यज्ञ आणि धार्मिक विधी करणे हे अत्यंत पुण्यदायी आणि सर्व प्रकारची समृद्धी आणि भाग्य प्रदान करणारे आहे.

कन्यागत महापर्वकालाची सुरुवात होताना नॄसिंहवाडी येथे फार मोठा शिबीकोत्सव साजरा होतो. शिबीकोत्सव म्हणजे पालखी सोहळा. ज्या वेळी गुरु कन्या राशीत प्रवेश करतो त्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची स्वारी म्हणजे उत्सवमूर्ती पालखीमध्ये बसवून ती मिरवणूकीने शुक्ल तीर्थ या ठिकाणी नेली जाते. नॄसिंहवाडी येथील एका मार्गाने ही मिरवणूक १ मैल अंतरावर शुक्लतीर्थ या ठिकाणी वाजत गाजत नेण्यात येते. शुक्लतीर्थ या ठिकाणी कृष्णावेणी पश्चिमवाहिनी आहे. तेथून ती नॄसिंहवाडी येथे मुख्य मंदिरासमोर आल्यावर पुन्हा दक्षिण वाहिनी होते. तेथे पहाटे समुहूर्तावर स्वारी स्नानासाठी शुक्लतीर्थावर नदीमध्ये उतरते. सर्व प्रकारचे धार्मिक विधी करुन सर्वांसक्षम स्वारी नदीमध्ये सचैल स्नानाचा आनंद घेते. सभोवती हजारो भाविक भक्त तो सोहळा हृदयामध्ये आणि आणि डोळ्यामध्ये साठवून ठेवत असतात. बारा वर्षांनी एकदाच होणारा हा परमपवित्र सोहळा सर्वांच्याच अंतरात्म्यामध्ये एक विलक्षण उर्जा आणि दैवी स्पंदने यांची निर्मिती करीत असतो. भावविभोर होवून भक्त नाचू लागतात. स्वारींचे स्नान झाल्यावर वाजत गाजत पुन्हा स्वारींना सभामंडपामध्ये औदुंबर वृक्षाखाली आणले जाते. याच दरम्यान शिरोळ येथून भोजनपात्र मंदिरातून स्वारींची पालखी स्नानासाठी येते आणि विधीपूर्वक स्नान घातले जाते. समोरच्या तीरावर अमरेश्वर मंदिरातून स्वारींची पालखी येते. तिथेही स्नानाचा कार्यक्रम संपन्न होतो. यांनंतर मात्र जमलेल्या भाविकांची स्नानासाठी एकच झुंबड उडते. कन्यागत महामर्वकाली स्वारींचे स्नान झाल्यावर ते पाणी अंगावर घेण्यासाठी कृष्णेच्या दोन्ही तीरावर हजारो भाविक आतूर झालेले असतात. अष्टतीर्थांच्या सान्निध्यामध्ये प्रत्यक्ष स्वारींच्या स्नानानंतरचे पाणी आपल्या अंगावर घेवून जन्मजन्मीचे पुण्य मिळवल्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते. एका विलक्षण आनंदाची, समाधानाची आणि तृप्तीची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आणि आपले जीवन धन्य झाले या भावनेने ते “अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त”, “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जयघोष करतात. या दिवशी कन्यागत महापर्वकालाची सुरुवात होते आणि नंतर संपूर्ण वर्षभर पुढे हा उत्सव सुरु राहतो. गुरु तूळ राशीमध्ये प्रवेश करेपर्यंत महापर्वकाल कन्यागत सुरू असते. कन्यागत महापर्वकाळ आणि वेळोवेळी होणारे उपक्रम यांची सर्व माहिती www.kanyagat.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. एक कोटी भाविक भक्तांचा कन्यागत व्हॉटस अप ग्रुप तयार होत असून फेसबुक आणि यू ट्यूब चॅनेलवरही कन्यागताची माहिती देण्यात येत आहे. संपूर्ण वर्षभर कृष्णातीरी कधीही कोठेही स्नान आणि धार्मिक विधी करता येतात. नृसिंहवाडीचा पहिल्या दिवशीचा सोहळा अत्यंत भव्य-दिव्य, मंगलमय आणि आपली चैतन्य जागृती करणारा असाच असतो. बारा वर्षातून एकदा येणारा हा सोहळा प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकदातरी नक़्कीच अनुभवला पाहिजे !

Source : http://www.kanyagat.com/

2,174 total views, 6 views today

By | 2017-01-09T05:20:13+00:00 July 28th, 2016|Events|0 Comments

Leave A Comment

11 + twenty =